अंबड ( जालना) : कोणाच्या विरोधात नाही तर ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी भूमिका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील ओबीसी समाज बांधवांच्या बैठकीत स्पष्ट केली. तसेच ओबीसीच पंचायतराजमधील आरक्षण या सरकारने धोक्यात आणले आहे. प्रस्थापितांकडून ओबीसी नेत्यांना लक्ष केलं जातं आहे. सरकारवर ओबीसी समाजाने दबाव वाढवावा लागेल, असे आवाहन देखील प्रा. हाके यांनी यावेळी केले.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. या उपोषणामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यातच ज्याठिकाणी जरांगे-पाटील उपोषणास बसले आहेत, त्याच गावात ओबीसी आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके हे उपोषण करणार होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. दरम्यान, अंतरवली सराटीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच बुधवारी रात्रीच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतले पण वकिलांमुळे आपण सुटलो असे प्रा. हाके म्हणाले. त्यानंतर आज सकाळी प्रा. हाके यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात हजेरी लावली. मेळाव्यात मार्गदर्शन करताना लक्ष्मण हाके म्हणाले, गावगाड्यातल्या छोट्या ओबीसी समाजामध्ये आपले आरक्षण जाणार याची भीती आहे, समाजाचे २९ टक्के आरक्षण वाचविण्यासाठी, समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आम्ही आंदोलन पुकारले, अशी भूमिका प्रा. हाके यांनी मांडली. तसेच ओबीसीचे हक्काचे आरक्षण वाचवा, बारा बलुतेदार म्हणजे ओबीसी हे सांगण्यासाठी विचारवंत पुढे येत नाही. संसदेत या विषयावर बोलणारे नेते हवे आहेत, असेही प्रा. हाके म्हणाले.
काहींनी व्यवस्था वेठीस धरली आरक्षणासाठी काही लोक व्यवस्था वेठीस धरत आहेत. सक्तीने आरक्षण आहे म्हणून तरी आपले काहीजण राजकारणात आहेत. तब्बल ४९२ जातींची बाजू मांडणारे नेते जातीयवादी कसे असू शकतात. सामाजिक न्यायासाठी ६० टक्के लोकसंख्येला केवळ ०.७ टक्के निधी मिळतो, अशी खंत देखील प्रा. हाके यांनी व्यक्त केली.
आंदोलन स्थळ सर्वानुमते ठरणार यावेळी विविध भागातून आलेल्या समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आंदोलनाच्या विविध मुद्यांवर चर्चा करून आंदोलन स्थळ सर्वानुमते ठरविण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. मेळाव्यात बळीराम खटके, रमेश वाघ,दीपक बोऱ्हाडे, संदीप खरात, रवींद्र खरात यांच्यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.