जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:37 AM2018-11-16T00:37:47+5:302018-11-16T00:38:03+5:30
लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट भूमिका घेत काँग्रेसला यंदा जालना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असून, सरकारच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसमधीलच उमेदवाराला प्राधान्य देऊन यावेळी बाहेरील उमेदवार लादू नये असे स्पष्ट मत बैठकीत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या या वक्तव्याचे दुहेरी अर्थ निघत आहेत. बाहेरील उमेदवार म्हणजे जालना जिल्ह्याबाहेरील का काँग्रेस पक्षाबाहेरील या बबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.
या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, ज्ञानेश्वर भांदरगे, माजी आ. धोडींराम राठोड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी राजेश राठोड आदींसह अन्य काँग्रेस नत्यांची उपस्थिती होती. जालना लोकसभेचा १९९९ पासूनचा विचार केल्यास खा.रावसाहेब दानवे यांच्य विरूध्द १९९९ मध्ये ज्ञानदेव बांगर हे होते, २००४ मध्ये माजी खा. उत्तमसिंग पवार तर २००९ मध्ये कल्याण काळे यांनी निवडणुक लढवली होती. त्यांनी प्रचंड ताकद लावून दानवेंचे मताधिक्य ८ हजारांवर आणले होते. २०१४ मध्ये देखील औरंगाबाद येथील विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत, रावसाहेब दानवे यांनी थेट दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला होता.
ज्ञानदेव बांगर वगळता अन्य तीनही निवडणुकीत दानवेंविरूध्द अन्य जिल्ह्यातील म्हणजेच औरंगाबाद येथील उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु ते जालना लोकसभा मतदार संघातीलच होते.
निवडणुकांच्या तयारीला आला वेग
मुंबईतील टिळक भवनमध्ये मराठवाड्यातील लोकसभेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी जालना लोकसभा मतदार संघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, डॉ.संजय लाखे पाटील, राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, सत्संग मुंडे, यांनी तयारी दर्शविली. यावेळी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारे कल्याण काळे यांनी मात्र यंदा लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी सलग चारवेळेस जालना लोकसभा मतदार संघातून विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाचव्या टर्मला त्यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदार रिंगणात उतरणार आहे, या बाबत आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत. दानवेंचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांना तगड्या उमेदवाराला निवडणुक रिंंगणात उतरविण्याची गणिते जुळविण्याची गरज आहे.