लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आम्हाला यंदा लोकसभा निवडणुकीची चिंता नाही, ती आम्ही जिंकणारच आहोत. मात्र आम्हाला मराठवाड्यातील दुष्काळाची चिंता आहे. सामान्य माणसाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची कामे कार्यकर्त्यांनी करायला हवीत. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन विषयक कामे, मराठवाडा ग्रीड आदी क्षेत्रात भरीव कामे केलेली आहेत.जालना आणि औरंगाबादमधुन जाणारा समृद्धी हायवे त्यामुळे या भागात होणारी औद्योगिक प्रगती यामुळे जालना- औरंगाबाद हे उद्योगाचे केंद्र तयार होणार आहे. ही कामे कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचविण्याण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.यावेळी भाजप, शिवसेना युतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी मामाचौकामधून शक्तीप्रदर्शन करत दानवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.रावसाहेब दानवे : जालना- औरंगाबाद मेट्रोने जोडणारजालना आणि औरंगाबाद ही लवकरच जुळी शहर होणार आहेत. औद्योगिक विकासामुळे शेंद्रा आणि जालन्यातील अंतर हे केवळ ४० किलोमीटर एवढेच अंतर राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात या शहरांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून मेट्रोने जोडण्याचे आपले ध्येय आहे.गेल्या पाच वर्षात जालना जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये आणल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.युतीचा धर्म पाळणार - अर्जुन खोतकरमध्यंतरी माझ्यात आणि रावसाहेब दानवेंमध्ये काही मुद्यावरून मतभेद होते, परंतु मनभेद नव्हते. आमच्या दोघांमध्ये वाद व्हावा, हे विरोधकांना हवेच होते. परंतु कुठे थांबायचे हे आपल्याला कळते. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असतो, त्यांनी युतीधर्म पाळण्याचे सांगितले, अन् आपण दानवेंसोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.आठवलेंकडून काँग्रेस लक्ष्यप्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत कविता सादर केल्या. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी डॉ. बाबासाहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस हे जळते घर आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यांना दोन्ही निवडणुकीत पराभूत करण्यासाठी मदत केली होती. मला देखील शिर्डी मतदार संघात असाच दगा दिल्याचे आठवले म्हणाले.
निवडणुकीची चिंता नाही, दुष्काळग्रस्तांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:53 AM