लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदे अंतर्गत गेल्या महिन्यात प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन प्रक्रिया पार पडली. या प्रक्रिये दरम्यान, पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत जी कागदपत्रे जोडली आहेत, त्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जवळपास २५० पेक्षा अधिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.शिक्षकांच्या बदल्या करतांना २० गावांची यादी त्यांच्यासमोर निवडीसाठी दिली होती. हे करत असताना अनेक शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत विनंती केली होती. यामुळे पती-पत्नींची बदली करताना त्या शिक्षकांना एकाच मार्गावरील शाळांमध्ये बदली करण्यात आली. ही बदली करताना अनेकांनी आपली पत्नी ही आशा केंद्रात नोकरीला असल्याचे सांगितले तर काहींनी अंगणवाडी ताई म्हणून कार्यरत असल्याची कागदपत्रे जोडली होती. या संदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आल्याने गेल्या महिन्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांच्याकडे अनेकजणांनी निनावी तक्रारी केल्या होत्या.या प्रकरणातील तथ्य तपासून पाहण्यासाठी शिक्षकांनी गुरूवारी जिल्हा परिषदेत सकाळी ११ वाजता त्यांनी जोडलेल्या मूळ कागदपत्रांसह हजर राहण्या संबंधी नोटिसा बजावल्या आहेत.जालना : शिक्षकांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्हजीवनात यशस्वी होण्यासाठी चुकीचे कामे अथवा नियम तोडू नये असे धडे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून दिले जातात. मात्र बदलीसाठी शिक्षकांनी जी काही शक्कल लढवली आहे, त्याचीच चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. एकूणच या गंभीर प्रकरणाची दखल आता स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुरूवारी या प्रकरणात दूध..का...दूध आणि पाणी... का...पाणी.. समोर येणार आहे. संवर्ग एक आणि संवर्ग दोन अशा दोन पातळीवर या आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये यंदा आर्थिक व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर चाप बसला हे नाकारता येणार नाही.
२५० शिक्षकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:15 AM