लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत बुधवारी देशभरात प्लास्टिक कचरा संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले. या अभियानाला जिल्ह्यातून ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. तर काही ग्रामपंचायतींनी प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांना नोटिसा बजावल्या.११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान जिल्हास्तरावर राबविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या कालावधीत गावात स्वच्छता शपथ घेणे, गाव पातळीवर निर्माण होणा-या प्लास्टिक कच-याचे योग्य पद्धतीने निर्मूलन करणे आदी बाबी करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतस्तरावर तीन टप्प्यांत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.बुधवारी जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्वच्छतेची शपथ घेऊन सार्वजनिक ठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा महाश्रमदानाद्वारे संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. यात महिला बचत गट, युवक मंडळ, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. नंदनवनकर यांनी घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव व रांजणी येथे प्लास्टिक कचरा मुक्त कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.काटखेडा व रांजणी येथील ग्रामपंचायतींना सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशीन बसविण्यात आल्या आहे. आणखी काही ग्रामपंचायतींना हे मशीन देण्यात येणार असून, तालुका व गावनिहाय कार्यक्रम राबविण्यासाठी संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जामखेड, देवीदहे, राजूर, माहोरा येथे प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.