आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:04 IST2025-01-06T16:03:06+5:302025-01-06T16:04:22+5:30
मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला.

आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत
जालना : जिथं आपण अधिक काम केलं तिथं आपल्या विरोधात फतवे निघाले. आजवर इमानदारीने काम केलं. मी पाच वर्षे वाट पाहणार नाही. जालन्यात राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार असल्याचे सांगत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले.
खा. कल्याण काळे यांनी सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोरंट्याल बोलत होते. गोरंट्याल यांनी आजवर केलेले काम आणि निवडणुकीत झालेला पराभव यावर मत व्यक्त केले. जालन्याच्या पाण्याचा प्रभावच वेगळा आहे. इथं चांगले काम केले की लोकं जा.. ना.. असे म्हणतात. मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला. इथं तुम्ही किमान २५ जणांना 'तूच महापौर होणार' असे म्हणा असेही गोरंट्याल खा. काळे यांना म्हणाले. आपण आणखी पाच वर्षे वाट पाहू शकत नाही. राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार आहे. परंतु, तत्पूर्वी जवळील साप, विंचवांना बाहेर काढणार असल्याचेही गोरंट्याल यावेळी म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही गोरंट्याल यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यात खासदारांच्या पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आपण पाच वर्षे वाट पाहणार नाही, असे म्हणत पक्षबदलाचे संकेतच गोरंट्याल यांनी दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
खोतकरांच्या निवडणूक उमेदवारी अर्जावर गोरंट्याल यांची याचिका
जालना विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खोतकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत लेखी स्वरूपात आक्षेप जालना विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असा आक्षेप गोरंट्याल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंट्याल यांचा आरोप आहे. न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल, अशी अपेक्षाही गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केली.