पालकमंत्री राजेश टोपे :
जालना : ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस विभाग सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असतो. समाजात सुख, शांती व समृद्धी प्राप्त होण्यामध्ये पोलीस विभागाचे कार्य अधोरेखित होते. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पोलीस दलाला मिळालेल्या वाहनांच्या मदतीने प्रभावीपणे पोलिसिंग करण्याबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांची संख्या वाढविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पोलीस विभागासाठी सव्वादोन कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या २० चारचाकी, तर ९२ दुचाकी वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते रविवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस ठाण्यांची व मनुष्यबळाची संख्या कमी असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे. या गोष्टीचा विचार करून असलेल्या नवीन पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली असून, जालना, अंबड, राजूर, घनसावंगी याठिकाणी नव्याने पोलीस ठाण्याच्या निर्मितीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. जिल्ह्यात नव्याने होणार असलेल्या या ठाण्यांमुळे मनुष्यबळ, तसेच इतर सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने पोलिसांवर येणारा ताण कमी होईल. त्याचबरोबर पोलीस वसाहतींमधील रस्ते, इमारत दुरुस्ती, दळणवळण सुधारणा आदी बाबींसाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत जिल्ह्यात सीसीटीव्ही उभारणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करून देण्याची ग्वाही टोपे यांनी दिली. आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पोलीस विभागाला वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करत पोलीस विभागाप्रमाणेच नगरपालिकेलाही घंटागाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
डायल ११२
सध्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या मदतीकरिता प्रशासनातर्फे वेगवेगळे क्रमांक उपलब्ध आहेत. सर्वसामान्य जनतेला पुरेशा माहितीअभावी विशेषत: ग्रामीण भागातील जनताही याबाबत संभ्रमित असते. नेमकी कोणाकडे मदत मागायची याबाबत माहिती नसल्याने मिळणाऱ्या मदतीस विलंब होतो. यासाठी संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया या शीर्षाखाली डायल ११२ हा मध्यवर्ती हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात येत आहे. संकटकाळी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क करून सर्वसामान्यांना मदत मागता येणार आहे.
पिंक मोबाइल
महिला व बालकांसंबंधी गुन्हेगारीचा तंत्रशुद्ध, दर्जेदार व शास्त्रोक्त व न्यायिक तपास होण्याच्या उद्देशाने पिंक मोबाइल हा उपक्रम सुरू होत आहे. या वाहनांवर महिला अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती राहणार असून, महिलांना त्यांची तक्रार नि:संकोचपणे व स्पष्टपणे याद्वारे करता येणार असल्याने गुन्हेगारांना शासन होण्यास यामुळे मदत होणार आहे.