जालना : सीटूच्या माध्यमातून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व शालेय पोषण आहार कामगारांनी निदर्शने केली. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना देण्यात आले.सर्व केंद्रीय कामगार संघटना व संबंधित फेडरेशनच्या वतीने बुधवारी विविध मागण्यांसाठी देशभरात संप पुकारण्यात आला. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सीटू संलग्न युनियन्सने या संपात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी निदर्शने करीत कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करीत घोषणाबाजी केली. सर्व केंद्रीय कल्याणकारी सेवा योजना कायमस्वरुपी राबवाव्यात, कर्मचा-यांशी अरेरावी करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर कारवाई करावी इ. मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिले. या वेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, गोविंद आर्दड, सुनंदा तिडके, विश्वेश्वर स्वामी, कांता मिटकरी, साजेदा बेगम यांची उपस्थिती होती. निदर्शनांमध्ये मंदा तिनगोटे, मंगल नरंगळे, मथुरा रत्नपारखे, संगीता वायखिंडे, मंदा शेळके, आशा मिसाळ, सुनीता छडीदार, वैशाली जोशी, वंदना लहाने यांच्यासह कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.परतुरात उपविभागीय कार्यालयावर मोर्चापरतूर : मनरेगाची कामे तात्काळ सुरू करावीत, मजुरांना बेरोजगार भत्त्याचे वाटप करावे इ. मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने बुधवारी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील कोरेगाव, गोळेगाव, रोहिणा बु. श्रीष्टी, सातोना बु. सिरसाठ खांडवी इ. गावांमध्ये मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. मनरेगा कामावर ५०० रुपये रोज देऊन दोनशे दिवस काम द्यावे, दरमहा ३५ किलो धान्य दोन रुपये दराने द्यावे इ. मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांना देण्यात आले. या वेळी मारोती खंदारे, सरिता शर्मा, सचिन थोरात, रंगनाथ तांगडे, बंडू कणसे, शेख शकिला, अशोक काळे, श्रावण शिंदे, नारायण हरदास आदींची उपस्थिती होती. मोर्चात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पोषण आहार कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:09 AM