जालना : आज ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कुपोषणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी पोषण बागांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले.
पोषण वाटिका महाअभियानाचे उद्घाटन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. त्याचे थेट प्रक्षेपण खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेतीसाहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे हे होते. तर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्न व पोषण विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे यांनीही ऑनलाइन सहभाग नोंदविला. केंद्र सरकारद्वारे सुरू केलेले पोषण अभियान महिलाच यशस्वी करू शकतात. पोषक तृणधान्ये हा आपला पारंपरिक आहार असून, शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिभूषण भगवानराव काळे यांनी केले. यावेळी डॉ. विजय नलावडे, विभागीय वनअधिकारी प्रशांत वरुडे, डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी तर आभार इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.