- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून सातत्याने त्यांची प्रकृती खालावत आहे. आज सकाळी उपोषणार्थी हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकाने तपासणी केली. यावेळी गेल्या तीन दिवसांपासून रक्तदाब वाढत असल्याने त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो, असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे यांनी दिली.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलना दरम्यान लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून सकाळपासून राज्यभरातून ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होत आहे.आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावल्याने सरकारने आंदोलनाची त्वरित दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भावना पाठिंबा देण्यास आलेल्या ओबीसी बांधवांनी व्यक्त केली आहे.
आमच्या अन्नात माती कालवली मनोज जरांगे म्हणत आहेत, आम्ही शंभर टक्के ओबीसी आरक्षणात घुसलोय आणि दुसरीकडे शासन म्हणते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही,' महान ' नेते खरं बोलत आहेत की शासन खरं बोलतेय? भुजबळ यांना टार्गेट करायचे आणि आम्हाला भाऊ म्हणायचं ? आमच्या अन्नात माती कालवणारा तू आणि आम्हाला भाऊ म्हणतो ? अशी जहरी टीका हाके यांनी केली.
‘सगेसोयरे’मुळे ओबीसीच नव्हे तर एससी, एसटी आरक्षणावरही गदा ‘सगेसोयरे’चा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे लेखी सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी नेते हाके यांनी व्यक्त केला.