लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर अगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली असून, त्याच्याकडून १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकारी २७ सप्टेंबर रोजी रात्री गस्तीवर होते. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेकॉर्डवरील आरोपी बाबासाहेब नारायण वांगे (रा. संजयनगर जुना जालना) हा दिसून आला. पोलिसांना पाहताच पळून जाणा-या वांगे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याच्याकडे लॉक तोडण्यासाठीचे लोखंडी रॉड, पकड, स्क्रू ड्रायव्हर असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच नारळ, अगरबत्ती, माचिस, हळद-कुंकू आदी पुजेचे साहित्यही मिळाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वांगे याने आपण मंदिरातचोरी करण्यास जात असल्याची कबुली दिली.वांगे याने जालना येथील अंबड रोडवरील जोगेश्वरी नगर भागातील साई मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले होते. तसेच एकूण सहा मंदिरात त्याने हात साफ केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वांगे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.या मंदिरात केली चोरीजालना शहरातील अंबड रोडवरील साई मंदिरातील दानपेटीतील रक्कम, नाव्हा रोडवरील मंदिरातील पितळी घंटा व समई, बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील हनुमान मंदिरातील पितळी घंटा व समई, गोंदी येथील अडभंगनाथ महाराज मंदिरातील दानपेटीतील पैसे, गोलापांगरी येथील तुळजा भवानी माता मंदिरातील सोन्याचे दागिने व पेटी फोडून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने तपासात मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या घरी कारवाई करून १० हजार ५०० रूपये, चार हजार रूपये किंमतीचे दागिने, तीन पितळी घंटा, दोन समई असा एकूण १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् डोळा दानपेटीवर ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:13 AM