जालना शहरातील लक्ष्मण उंबरे यांचा गुरुवारी दुपारी श्याम चिकटे व जितेंद्र आरसूळ यांनी खून केला होता. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. शुक्रवारी दुपारी दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस काेठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील श्याम उर्फ रमेश चिकटे याने शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीला तातडीने ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिडरकर व पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी ३० कर्मचाऱ्यांसह २९ पोलीस मित्रांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. सुरुवातीला सदरील आरोपी हा चंदनझिरा येथेच असल्याची माहिती मिळाली. चंदनझिऱ्यात आरोपीचा शोध घेत असतानाच, सदरील आरोपी हा समृद्धी महामार्गाने पळाला असल्याची माहिती मिळाली. यानंतर समृद्धी महामार्ग व परिसरातील डोंगरदऱ्यांत आरोपीचा शोध घेतला. तेथेही आरोपी सापडला नाही. सदर आरोपीने आत्महत्या केली की काय? अशी शंका पोलिसांना आली. त्यानंतर परिसरातील विहिरींची पाहणी करण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच सदर आरोपी हा इंदेवाडी येथील मित्राकडे पैसे मागण्यासाठी आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी श्याम चिकटे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. ही कामगिरी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि. संदीप सावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी साई पवार, अनिल काळे, नंदलाल ठाकूर, चंद्रकांत माळी आदींनी केली आहे.
अनिल काळे यांची महत्त्वाची भूमिका
सदर आरोपी हा इंदेवाडी येथील मित्राकडे आल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल काळे यांना मिळाली होती. त्यांनी लगेचच पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना सांगितले. त्यानंतर सापळा रचून सदर आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.