लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला आहे, अशा स्थितीत पाणीटंचाई तसेच मजुरांना कामे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. असे असतांना अनेक अधिकारी, कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्रेकर यांनी पाच तास आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, स्वामी, तहसीलदार सुधाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रेकर यांचा रोख हा सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक होता. अनेक अधिका-यांना जागेवर उभे करून त्यांनी त्या विभागाचा जाब विचारला. काही अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने त्यांच्यावर केंद्रेकर हे जाम चिडल्याचे सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित सभागृहातही केंद्रेकरांनी आढावा घेताना अधिकारी, कर्मचा-यांना चांगलाच घाम फोडला. बैठक पाच तास चालल्याने केवळ ज्यांना प्रकृतीची कारणे आहेत, त्यांना काही काळ बैठकीबाहेर जाऊन येण्यास परवानगी दिली होती.अनेक गावांमध्ये शेतक-यांना कर्जमाफी, पीकविमा तसेच शासनाकडून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान वाटपात गोंधळ दिसून आला. ही बाब गंभीर असल्याचे सांगून एका गावातील तलाठ्याकडे तीन सजाचा पदभार असल्याने हा गोंधळ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु मंडळ अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवकांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दुष्काळ असल्याने कुठल्याच विभागाने तो सहज न घेण्याचे आदेश दिले. मजुरांना कामे उपलब्ध करून देताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचेही दिसून आले.दुष्काळ : बँकांनी अनुदान वाटप न केल्यास गुन्हे दाखल करणारजालना जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळेच टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे जरी मान्य असले तरी, टँकरने योग्य त्या फे-या होतात काय, याची तपासणी करण्याचे सांगितले. तसेच टंचाईचे आलेले प्रस्ताव संबंधित विभागातील अधिका-यांनी आठवड्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचेही ते म्हणाले.अनेक बँकांमध्ये शासनाचे विविध योजनेतून शेतकºयांसाठी अनुदान आणि मदत आली आहे. मात्र, ती केवळ खाते क्रमांक तसेच अन्य काही कारणांमुळे वाटप होत नसल्याचे दिसून आले. ते शेतकºयांच्या खात्यात न गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसह टँकरचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठक संपल्यावर केंद्रेकर यांनी बदनापूर येथील सोमठाणा धरणास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मजुरांना कामे उपलब्ध करून देताना ती जलसंधारणाची द्यावीत असेही केंद्रेकरांनी सुचविले.
विभागीय आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM