उपायुक्त बेदमुथा; सुंदर माझे कार्यालय उपक्रमाला प्रारंभ
जालना : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसभरातील एकतृतीयांश वेळ कार्यालयातील सुधारणांसाठी म्हणजे आपले कार्यालय सुंदर करण्यासाठी द्यावा, असे आवाहन उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेंतर्गत ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांच्यासह विभागप्रमुख, खातेप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी व कक्ष अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उपायुक्त बेदमुथा म्हणाले की, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के कर्मचारी पंचायत राज व्यवस्थेत कार्यरत असतात. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसभरातील एकतृतीयांश वेळ कार्यालयातील सुधारणांसाठी म्हणजे आपले कार्यालय सुंदर करण्यासाठी द्यावा. त्यामुळे कार्यालयातील वातावरण बदलण्यास मदत होऊन त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल होण्यास, म्हणजे उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यास नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपले कार्यालय आणि त्याचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निटनेटका केला, तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होण्यास मदत तर होईलच, त्याचबरोबर नागरिकांनाही अशा कार्यालयात आल्यानंतर आनंद वाटेल. तथापि, कर्मचाऱ्यांनी हे काम करताना नागरिकांच्या कामांनाही प्राधान्य द्यावे. कामात कुचराई करू नये, प्रत्येकाने कामावर भर द्यावा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.