जालना : शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी काी जणांनी फोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जुना जालन्यातील झोननिहाय पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे.जायकवाडी-जालना योजनेवरील व्हॉल्व्ह फोडून पाणी घेण्याचे प्रकार अंबड, पाचोड परिसरात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांना सूचना दिल्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने जालना शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. मंगळवारी दुपारी पाचोड तालुक्यातील थेरगाव परिसरात स्थानिकांनी एअरव्हॉल्व्ह फोडला. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. याबाबत माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक थेरगावात पोहोचले. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जायकवाडी योजनेपासून शिरनेर टेकडीपर्यंत संपूर्ण जलवाहिनी रिकामी करावी लागणार आहे. यासाठी सुमारे बारा तासांचा वेळ लागणार आहे. बुधवारी जलवाहिनी रिकामी झाल्यानंतर प्रत्यक्ष व्हॉल्व्ह दुरुस्ती काम करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेस चार दिवस लागणार असल्याने जुना जालन्यात प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे. शहरातील काही भागांत अंतर्गत जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असल्याने जुनी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.------------जलवाहिनीची सुरक्षा वाºयावरजायकवाडी- जालना योजनेवर सुमारे अडीचशे व्हॉल्व्ह आहेत. अनेक गावांमध्ये नागरिक जलवाहिनीतून वाया जाणाºया पाण्याचा विचार न करता व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी घेत आहेत. यामध्ये काही शेतकºयांचाही समावेश आहे. हे पाणी थेट विहिरीत सोडले जात असल्याचे काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत दिसले होते. त्यानंतर जलवाहिनीच्या देखरेखीसाठी बंदूकधारी पोलीस तैनात करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. व्हॉल्व्ह सुरक्षेसाठी वरील बाजूस पत्रे बसविण्याचे नियोजनही पालिकेने केले होते. परंतु हा निर्णयही हवेत विरला.--------------नागरिकांनी सहकार्य करावेनादुरुस्त झालेला व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने नागरिकांनी पाण्याची बचत करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.
जुना जालन्यात चार दिवस निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:13 PM