तीर्थपुरी : जोगलादेवी बंधा-यात बुधवारी दिवसभर पाणबुडीच्या साह्याने शोध घेऊनही बेपत्ता संतोष खोजे याचा शोध लागला नाही. दरम्यान, नातवाच्या विरहाने व्याकुळ आजीने आजोबाच्या दहाव्याच्या दिवशीच प्राण सोडला. त्यामुळे जोगलादेवी गावात हळहळ व्यक्त होत आहे.जोगलादेवी येथील संतोष खोजे हा आजोबा ज्ञानदेव खोजे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या दहाव्याच्या विधीसाठी आळंदीहून गावी आला होता. सोमवारी रात्री लघुशंका करून येतो, असे सांगून तो घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी जोगलादेवी बंधा-यात संतोषच्या चपला तरंगताना आढळून आल्या. तो पाण्यात बुडाला असावा, या अंदाजामुळे दोन दिवसांपासून जोगलादेवी बंधा-यात शोध सुरू आहे. बुधवारी सकाळपासून पाणबुडीच्या मदतीने बंधाºयात पथकाने शोधकार्य सुरू केले. घनसावंगीचे नायब तहसीलदार एस. व्ही. मोरे, मंडळाधिकारी एस. टी. साळवे, तलाठी ठाकरे यांनी घटनास्थळी सूचना दिल्या. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नाही. अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले.संतोषचे आजोबा ज्ञानदेव खोजे यांचा बुधवारी दहाव्याचा कार्यक्रम होता. नातू बेपत्ता झाल्याच्या धक्क्यामुळे आजी कौशल्याबाई खोजे यांनी दुपारी प्राण सोडले. त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे खोजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.----------सर्वांशी चांगले संबंधबेपत्ता संतोष खोजे हा आळंदी येथे एका खाजगी कंपनीत नोकरीस आहे. त्याला एक मुलगा आहे. संतोषचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे संतोषचे नेमके काय झाले, याबाबत सर्वच चिंतेत आहेत.-----------
पतीचा दहावा.. नातू अचानक बेपत्ता.. वृद्धेनेही सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:22 AM