जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथे वृध्द व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली.
जालना येथील वृद्ध व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे नवा मोंढ्यात बारदाण्याचे दुकान आहे. ते सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात होते. जुन्या जालना येथील शिवशक्ती दाळमिलमधील घरासमोर स्कुटी उभी करताच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भानुशाली यांना बळजबरीने उचलून त्यांचे अपहरण केले.
त्यानंतर अपहरण कर्त्यांनी त्यांच्या घरी फोन करून ५० लाखाची खंडणी मागितली. याप्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलिसांना शोधण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर शहर व परिसर पिंजून काढला. पोलिसांनी दे.राजा रोडवरील वन विभागाचा परिसर पोलिसांनी घेरल्यानंतर अपहरणकर्त्यांनी भानुशाली यांना सोडून फरार झाले. मध्यरात्री १ वाजेपर्यंत पोलिसांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे भानुशाली यांची सुटका केली आहे.