लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘गरिबांना साड्यांचे वाटप सुरू आहे’ असे खोटे सांगत साडी घेऊन देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडील दागिने, रोख रक्कम असा ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मंगळवारी दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अमरछाया टॉकीज रोडवर घडली. या प्रकरणी दोघांविरूध्द बुधवारी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील गांधीनगर भागातील रेणुकामाता मंदिराजवळ राहणाऱ्या पार्वतीबाई रमेश गायकवाड (७०) या १९ नोव्हेंबर रोजी दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अमर छाया टॉकिज मार्गावरून जात होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या दोन अनोळखी युवकांनी ‘गरिबांना साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. तुम्हाला साड्या घेऊन देतो’ असे म्हणत रस्त्याच्या बाजूला नेले. ‘दागिने व पैसे आमच्याकडे द्या, ते पिशवीत ठेवतो’ असे भासवून दागिन्यांसह पैसे असा ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल घेतला. तो मुद्देमाल घेऊन ते दोघे चोरटे फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बुधवारी पार्वतीबाई गायकवाड यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ पवार हे करीत आहेत. दरम्यान, अनोळखी व्यक्तीकडून दाखविल्या जाणाºया आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
वृध्द महिलेकडील दागिन्यांसह रोकड भर दुपारी केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:52 AM