एक हजार रोपांची लागवड
वरूड : भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील भंडारगड टेकडी येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या वतीने एक हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. यात ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी देविदास पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, भगवान पाटील, सांडू वाघ, जिल्हा परिषद सदस्य दौड, दिलीप वाघ आदींची उपस्थिती होती.
शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडी
जालना : जुना जालना भागातील शनि मंदिर परिसरात सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय झाली. शनि मंदिर परिसरात वाहतुकीचे सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
गजानन गायकवाड यांची निवड
वालसावंगी : येथील गजानन गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सचिवपदी निवड करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीचे जिल्हा परिषद सदस्य शंकर भुते, जुमान चाऊस, गणेश पायघन, विजय गवळी, किरण फुसे, प्रवीण कोथलकर, फकिरा गवळी, कुलदीप बारवाल, दीपक तायडे, शालीग्राम गवळी, संजय उदरभरे आदींची उपस्थिती होती.
शेवगळ येथे नेत्र तपासणी शिबिर
घनसावंगी : तालुक्यातील शेवगळ येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बॅंकेचे माजी संचालक लोंढे, संदीप लोंढे, तात्याराव लोंढे, ज्ञानेदव लोंढे, प्रमू लोढे, समाधान लोंढे, संताराम मोरे, रामप्रसाद मोरे, आबासाहेब महाराज लोढे, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठेे यांना अभिवादन
जाफराबाद : तालुक्यातील बोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभाकर लोखंडे, भिकाजी लोखंडे, अनिल खंदारे, विजय खंडागळे, दिलीप खंदारे, श्रीकृष्ण खंदारे, राजू खंडागळे आदींची उपस्थिती होती.
भोकरदन शहरात पावसाची हजेरी
भोकरदन : शहरासह तालुक्यातील काही भागात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सलग वीस दिवस दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जून महिन्यात रूसलेल्या पावसाने थेट जुलै महिन्यात जोरदार आगमन केले आहे. पेरणीनंतर पाऊस नसल्याने अनेक भागांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.
पावसामुळे रस्त्यावर चिखल, नागरिक त्रस्त
परतूर : तालुक्यातील वाटूर येथील गावांतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस झाला की, या मार्गावर चिखल होत आहे. या चिखलातून प्रवास करताना चालकांना कसरत करावी लागत असून, पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने गावांतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बिअर शाॅप फोडली
जालना : बदनापूर तालुक्यातील सोमठाणा रस्त्यावरील उमा बिअर शाॅपीच्या छताचे पत्रे वाकून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर ४६ हजार ९३५ रुपयांच्या बिअर आणि वाईनच्या बाटल्या, १ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल संच लंपास केला आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष
भोकरदन : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. परंतु, शहरातील बाजारपेठेत अनेक नागरिक निर्बंधांचे उल्लंघन करीत आहेत. अनेकजण विनामास्क फिरत असून, सुरक्षित अंतराच्या नियमालाही तिलांजली दिली जात आहे.
अंबड येथे निदर्शने
अंबड : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर कोरोना नियमांचे पालन करून राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्या वतीने गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी डी. टी. भिसे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी एस. बी. घोडके, बी. एल. उघडे आदी हजर होते.