लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी दुपारी शहरातील मिलन चौक भागात करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.जालना शहरातील एका व्यक्तीकडे तीन-चार दुचाकी असून, तो रोज एक दुचाकी घेऊन फिरत आहे. तो शनिवारी दुपारी शहरातील मिलन चौकात दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती एडीएसचे (दरोडा प्रतिबंधक पथक) प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिलन चौकातील सापळा रचला. यावेळी लाल रंगाची दुचाकी घेऊन आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने शेख नसीम अब्दुल खयुम (रा. मरकस मशिद जवळ, तुटुपुरा जालना) असे नाव सांगितले. दुचाकीबाबत चौकशी केली असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीच्या ९० हजार रूपये किमतीच्या चार दुचाकी पोलिसांना दिल्या. शनिवारी पकडलेल्या दुचाकी चोराने कोठून दुचाकी चोरल्या, चोरीच्या दुचाकी इतर कोणाला विकल्या आहेत का, यासह इतर बाबींचा तपास सुरू असून, त्याच्याकडून वाहन चोरीतील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी. स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, गजानन भोसले, श्रीकुमार आडेप, आकाश कुरील, दीपक अंभोरे यांच्या पथकाने केली.दरम्यान, दरोडा प्रतिबंधक पथकाने गतवर्षी अनेक दुचाकी चोरीसह इतर वाहन चोरीचा उलगडा केला आहे. चालू वर्षातही या पथकाने दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. वाहनांची चोरी होऊ नये, यासाठी चालकांनी आपली वाहने उभी करताना त्यांना हॅण्डल लॉकसह इतर लॉक लावावेत, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.चार ठिकाणी केल्या चो-यापोलिसांनी अटक केलेल्या शेख याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरातील महेशनगर, कच्ची कॉलनी, भोकरदन, बदनापूर येथून दुचाकी चो-या केल्याची कबुली दिली. शेख याने चोरलेल्या दुचाकी शहरातील एका कब्रस्तानच्या बाजुला ठेवल्या होत्या. संबंधित ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी या दुचाकी ताब्यात घेतल्या. यातील काही दुचाकींची माहिती मिळाली असून, एक दुचाकी बेवारस असल्याचे सांगण्यात आले. चोरीतील बेवारस दुचाकीची उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत माहिती काढण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केलेली आहे.
चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:36 AM