लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका मुलीला जंगलात नेऊन मारहाण करीत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्यास जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १६ हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना ९ जुलै २०१५ रोजी रात्री जालना परिसरात घडली होती.संजय रंगनाथ हावरे (रा. रोहनवाडी जालना) असे आरोपीचे नाव आहे. ९ जुलै २०१५ रोजी आरोपी संजय हावरे याने पीडित मुलीला तुझा मोबाईल देतो म्हणून अंबड चौफुली परिसरात बोलावून घेतले. ती मुलगी येत असताना तिची स्कूटी अडवून त्याने कच्च्या रस्त्याने नेत तिला मारहाण केली. नंतर तिला त्याच्या दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात संजय हावरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोनि रफिक एन. शेख, उपाधीक्षक दीक्षित कुमार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या समोर सुनावणी झाली.या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सहायक सरकारी वकील अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश वेदपाठक यांनी आरोपी संजय हावरे याला कलम ५०६ भाग दोन नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रूपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास. तसेच कलम ३७६ आणि कलम ६ बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास दोन वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावल्याची माहिती सहायक सरकारी वकील अॅड. वर्षा मुकीम यांनी दिली आहे.या प्रकरणात सरकार पक्षाकडून दहा जणांची साक्ष तपासण्यात आली. यात पीडित मुलगी, फिर्यादी, डॉक्टर, शाळेच्या मुख्याध्यापिका व तपासाधिकाऱ्यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.
अत्याचार प्रकरणात एकास जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:25 AM