जालना : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी शनिवारी एक वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. एहतेशमुद्दीन उर्फ आक्कूभाई रफीक मोमीन (रा. हकीम मोहल्ला, जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, तर शेख अलीम शेख नूर, रूबीना अलीम शेख (दोघे रा. फुकट नगर, जुना जालना) यांना चांगल्या वर्तणुकीच्या बाँडवर सोडण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फुकट नगर येथील फिर्यादी कडूबाई आठवले यांच्या मालकीच्या खोलीचे काम करायचे असल्याने त्यांनी भाडेकरू आरोपी शेख अलीम व शेख रूबीना यांना घर खाली करण्यास सांगितले.
त्यांनी आरोपी एहतेशमुद्दीन उर्फ आक्कूभाई याला बोलावून घेऊन तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व एहतेशमुद्दीन ऊर्फ अक्कूभाई याने फिर्यादीस जाचीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात कडूबाई आठवले, संदीप आठवले, प्रभू दाभाडे, राहुल तांबे, पोलिस मरळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश ए. डी. देव यांनी आरोपी एहतेशमुद्दीन ऊर्फ आक्कूभाई रफीक मोमीन यास एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर आरोपी शेख अलीम शेख नूर, रूबीना अलीम शेख यांना चांगल्या वर्तणुकीच्या बाँडवर सोडण्यात आले आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.