जालना : सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास अंबड जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष विष्णू भुतेकर (३४, रा. बोधलापुरी, ता. घनसावंगी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी वशिष्ट प्रल्हादराव रेंगे हे घनसावंगी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सेवकपदावर कार्यरत आहे.
४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वशिष्ट रेंगे हे बोधलापुरी शिवारात पोखरा योजनेअंतर्गत स्थळपाहणी करण्याचे काम करीत होते. त्याच वेळी आरोपी संतोष भुतेकर म्हणाला की, तू इतक्या दिवस आमच्या शेताची स्थळपाहणी का केली नाही, तुला जास्त माज आलाय, स्थळपाहणी न केल्यामुळे आमच्या शेतीचे फार नुकसान झाले आहे, असे म्हणून त्याने वशिष्ट रेंगे यांना मारहाण केली. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वशिष्ट रेगे, पंच, साक्षीदार शिवाजी तौर, तपासिक अंमलदार पांडुरंग माने यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे वाल्मीक घुगे यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी संतोष भुतेकर याला एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील वाल्मीक घुगे, व्ही. एन. चौकीदार यांनी काम पाहिले.