जालना : वडीगोद्री येथील बाप-लेकीस चाकूने भोसकून जखमी करणारा आरोपी राजू श्रीरंग राठोड (४२, रा. वडीगोद्री, ता. अंबड) यास अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. वीरेश्वर यांनी गुरुवारी एक वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
८ ऑक्टोबर २०१९ रोजी वडीगोद्री येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील फिर्यादीचा भाऊ रमेश खैरे व मुलगी मयूरी या दोघांना आरोपी राजू राठोड याने चाकूने भोसकून जखमी केले होते. शिवाय, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी शिवाजी महादेव खैरे यांच्या फिर्यादीवरून संशयित राजू राठोड याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केेले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी शिवाजी खैरे, जखमी मयूरी खैरे, घटनास्थळ व जप्ती पंच, डॉ. आलिया खान, तपासी अंमलदार तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी. शेवगण यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा साहाय्यक सरकारी वकील वाल्मिक घुगे यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी राजू राठोड यास एक वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा साहाय्यक सरकारी वकील वाल्मिक घुगे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी बळीराम खैरे, शंकर परदेशी, उषा अवचार यांनी मदत केली.