या मातीच्या उदरात...कविता उगते???????????????????????????????????? माझी -कवी गीतकार सखाराम डाखोरे
जालना : शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ऑनलाइन आयोजित ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ शनिवारी चांगलेच रंगले. समाज व्यवस्था, शेतकरी आंदोलनासह स्त्री जाणिवांचा संदर्भ देत हळुवार प्रेम विषयक कवितांनी कविसंमेलनास रंगत आली.
जेईएस महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसई येथील कवी-गीतकार डॉ. सखाराम डाखोरे हे होते. यावेळी औरंगाबाद येथील कवयित्री प्रिया धारुरकर, प्रा. प्रदीप देशमुख, कवी कैलास भाले, प्रा. दिगंबर दाते, डॉ. महावीर सदावर्ते, डॉ. वसंत उगले, डॉ. नागनाथ शेवाळे या कवींचा सहभाग होता.
कविसंमेलनात प्रा.दिगंबर दाते यांनी ‘क्रांती’ या कवितेतून समाजमनाचे वास्तव चित्रण मांडत विवेकाचा विचार रुजविणारे शहीद नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या विचारांची गरज कशी हे कवितेतून मांडले. मंठा येथील कवी प्रा. प्रदीप देशमुख यांनी सादर केलेल्या ‘तू लिहित राहा, मी उलगडत जाईल’ या कवितेतून तरल प्रेमभाव व्यक्त करीत जबाबदारीचे भान कसे असावे अशा आशयाच्या कवितेला ऑनलाइन रसिकांनी चांगलीच दाद दिली. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली. परंतु सामान्य माणसाचे जगणे सुरक्षित आहे का ? अशा आशयाची ‘झेंडा’ कविता कवी कैलास भाले यांनी सादर केली. कविसंमेलनात स्त्री जीवनाचा पट उलगडून दाखवित ‘त्या मुक्या कळ्यांना झरे फुटतात’ ही आशयघन कविता कवयित्री प्रिया धारुरकर यांनी सादर केली. कवी डॉ. सुहास सदाव्रते यांनी ‘साने गुरुजींच्या स्वप्नातील समतेचे मंदिर कुठे आहे’ या कवितेतून समाज व्यवस्थेचे परखड चित्रण मांडत अंतर्मुख केले.
डॉ.महावीर सदावर्ते यांनी कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कविसंमेलनाचे अध्यक्ष गीतकार डॉ.सखाराम डाखोरे यांनी ‘मायबाप’ कविता सादर करून नातेबंधाचा ठाव घेतला. तरल प्रेमभाव व्यक्त करणारी ‘माझ्या मामाचं गाव’ ही कविता सादर करून कविसंमेलनास बहार आणली. कविसंमेलनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुहास सदाव्रते यांनी केले.
फोटो ओळी
जालना : जेईएस महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ऑनलाइन कविसंमेलन पार पडले. यावेळी गीतकार सखाराम डाखोरे, प्रिया धारुरकर, कैलास भाले, प्रा.दिगंबर दाते व अन्य.