लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण प्रगतीपथावर पोहोचले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असतानाही युवक नको, त्या गोष्टींकडे का वळला, याचा विचार करुनच गुरुमाऊलींनी बाल संस्काराला महत्व देत केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश- विदेशातही बाल संस्कार केंद्रे उभारली आहेत. ही केंद्रे आजच्या काळाची गरज बनली आहे. संस्कारित पिढी निर्माण झाली तरच देश टिकून राहील, असे प्रतिपादन बाल संस्कार व युवा प्रबोधनाचे प्रमुख नितीन मोरे यांनी केले.जालना गणेश फेस्टिव्हल आणि श्री स्वामी समर्थ केंद्रांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अथर्वशीर्ष पठण आणि सेवा- बालसंस्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जालना गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष साईनाथ पवार, कार्याध्यक्ष सुरेश मुळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सीमा खोतकर, विमल आगलावे, विलास देशमुख, प्रल्हाद बिल्हारे, नगरसेविका संध्या देठे आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरु केला. त्यातील एक हेतू सफल झाला असला तरी आजचे गणेशोत्सवाचे स्वरुप पाहता हा एक चिंतेचा विषय बनला आहे. मात्र गणेश मंडळींनी चांगले उपक्रम हाती घ्यायला हवेत.जालना गणेश फेस्टिव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी सेवा मार्गाला व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल त्यांचे खरोखरच आभार मानले पाहिजेत. स्वामी समर्थांचा सेवा मार्ग हा जातपात आणि अंधश्रध्दा मानणारा नाही. सेवेकरी हीच जात आणि माणूस हाच आमचा धर्म आहे. म्हणूनच गुरुमाऊलींनी अंधश्रध्देला थारा न देता या मार्गाला विज्ञानाच्या दृष्टिकोनाची जोड दिली आहे. आज मनुष्याचे राहणीमान उंचावले असले, तरी नाना प्रकारचे रोग आले आहेत. पूर्वी घर हे शेणाने सारवले जात होते. तेव्हा कोणतेही रोग नव्हते. गाईच्या शेणात खूप मोठे गुण आहेत. योग- यज्ञात तुपाची आहुती दिली जाते, यातही शास्त्रापेक्षा वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर यज्ञ आणि तुपाची आहुती हे समीकरण उगीचच नाही. परंतु काही लोक यालाही अंधश्रध्दा समजत आहेत. सेवा मार्गात प्रत्येक गोष्टी ही विज्ञानाला धरुनच असल्याचे त्यांनी सांगितले.आई- वडिलांचे दर्शन का घ्यावे, याचेही मर्म त्यांनी खूप सुंदरपणे श्रोत्यांसमोर मांडले.यावेळी मोरे म्हणाले की, संस्कृत भाषा ही अवघड असली, तरी पूर्वी संस्कृत भाषेवरच मोठा भर होता. संस्कृत ग्रंथांमध्ये एवढी शक्ती आहे की, जी आपल्याला माहीत नाही. आपल्या संस्कृत ग्रंथांवर जर्मनीसारख्या देशात अठरा विद्यापीठातून संस्कृत भाषेचे संशोधन चालू आहे. विमान उडण्याचे सूत्र हे संस्कृतमधून सापडले. म्हणूनच देशात संस्कृत भाषेवर संशोधन होण्यासाठी संस्कृत संशोधन केंद्रे उभारली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
संस्कारित पिढी निर्माण झाली तरच देश टिकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:06 AM