लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नगरपालिकेच्या स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा मैदानात स्थानिक नागरिकांनी चक्क आपल्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे पाईप सोडले आहेत. त्यामुळे क्रीडा मैदानाचे गटार होत असून, संरक्षण भिंत कमकुवत झाली आहे. मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंची यामुळे गैरसोय होत आहे.फक्त आपल्या घरात स्वच्छता असायला हवी, बाकी बाहेरच्यांशी मला काय करायचे, या मानसिकतेमुळे जालन्यातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. याचेच उदाहरण जुना जालना भागातील नगरपालिकेच्या क्रीडा मैदान परिसरात दिसून येत आहे.मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या मागील बाजूस वास्तव्य करणाºया काही उच्चभ्रू नागरिकांनी आपल्या घरातील सांडपाण्यासह स्वच्छतागृहांचे आऊटलेट क्रीडा मैदानात सोडले आहेत. यासाठी क्रीडा मैदानाच्या भिंतीलाच भगदाड पाडण्यात आले आहेत. सांडपाणी मैदानात सोडल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भिंतीलगत गटार तयार झाले आहे. सांडपाणी भिंती खालून वाहत असल्याने सुरक्षा भिंत कमकुवत झाली आहे. मैदानावर सकाळी व सायंकाळी खेळण्यासाठी येणारे खेळाडू याबाबत तक्रार करत आहेत. मैदानाच्या दक्षिण बाजूने मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
फक्त माझं घर स्वच्छ हवं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:50 AM