लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंदिरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळे बंद आहेत. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील राजुरेश्वराचे मंदिर जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे मंदिर आहे. या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या आजूबाजूला व संपूर्ण राजूर गावात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते; मात्र कोरोनामुळे ती बंद आहे.
शासकीय नियमाप्रमाणे बाकी सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. मंदिरे मात्र, भाविकांसाठी अद्यापही खुली करण्यात आली नाहीत. कोरोनाचे नियम पाळून थोड्या प्रमाणात हळूहळू भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास हरकत नाही.
मंदिरे बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या सर्वच वर्गांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने इतर व्यवसायाप्रमाणेच मंदिरेही सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
दररोज प्रभात फेरी काढून राजुरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन विसर्जित होत असे. परंतु, मंदिर बंद असल्यामुळे श्रींचे दर्शन दुर्लभ झाले आहे. पायरीचे किंवा कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे.
- सुंदर काबरा
भाविक, राजूर
सकाळी उठल्यानंतर प्रथम राजुरेश्वराचे दर्शन हा दिनक्रम होता; मात्र मंदिर बंद असल्याने दर्शनाला खंड पडला आहे. शासनाने इतर व्यवसायाप्रमाणेच धार्मिक स्थळे तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
- आत्माराम कदम
भाविक, राजूर
१५ लाख रुपयांची उलाढाल ठप्प
कोरोना संकटामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे. त्याचा संस्थानच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, जवळपास १५ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
- गणेश साबळे, पुजारी
मंदिर बंद असल्याने भाविकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दररोज चार ते पाच हजार रुपये मिळायचे. आता केवळ १ हजार रुपये हातात पडत आहेत. शासनाने मंदिरे सुरू करावीत.
- दिलीप डवले, हाॅटेल व्यावसायिक
मंदिर बंद असल्याने भाविकांचा ओघ मंदावला आहे. त्याचा नारळ, प्रसाद विक्रीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले आहे. शासनाने मंदिरे सुरू करावीत.
- हिरालाल जामदार, विक्रेता.