लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयात २६ मार्च रोजी सकळी ११ वाजता पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत. तशा आशयाचे पत्र पुणे येथील उप पारपत्र अधिकारी जयंत डी. वैशंपायन यांनी पाठवले आहे.काही दिवसांपूर्वी शहरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिली होती. तत्पूर्वी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पोस्ट कार्यालयात जाऊन जागेची पाहणी करून पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीच्या जागेला मान्यता दिली. जालन्यात हे केंद्र सुरू व्हावे म्हणून खा. दानवे यांनी परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन केंद्रास मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर या कार्यालयास मान्यता देण्यात आली आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, पिंपरी चिंचवड व सांगली येथील पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. या सेवा केंद्रामुळे सोलापूर आणि पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवरील भार कती झाला आहे. जालन्यात पासपोर्ट सेवा केंद्र झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. जालना येथील नागरिकांना या पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी नागपूरला जावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होत असे. येथील नवीन पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.