पहाटेचा शपथविधी ही खेळी असू शकते. त्यामुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे.
जयंत पाटलांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. याचदरम्यान भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे. भाजपावर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं?, ते मी नावासहित उघड करेन, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
आशिष शेलार यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्या स्तरावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. तसेच कोण काय म्हणतंय याला उत्तर द्यायला मी मोकळा नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच पहाटेच्या शपथविधीवर मी कधीही बोलणार नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचीही ती खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असं जयंत पाटील म्हणाले.
काहीही अर्थ नाही - मंत्री चंद्रकांत पाटील
जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.