लोकमत न्यूज नेटवर्कजामवाडी : नागपूर - समृद्धी हायवेवर जालना शहरालगत जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी शिवारात इंटरचेंज पॉइंट प्रस्तावित करण्यात आलेले आहे. परंतू, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळातील काही वरिष्ठ अधिकारी, नेते मंडळी हा इंटरचेंज पॉइंट हलवून निधोना किंवा खादगाव येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी ३० डिसेंबर २०१६ व ८ मार्च २०१७ रोजी दोन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या अधिसुचनेनुसार जामवाडी शिवारातील १.९७ हेक्टर गुंडेवाडी शिवारातील ६५.८० हेक्टर जमीन तांदूळवाडी शिवारातील ६. ९८ हेक्टर व जालना शिवारातील ६. ७३ हेक्टर जमीन इंटरजेंच पॉर्इंट अधिसूचित करण्यात आलेली आहे.अधिसूचित करण्यात आलेला इंटरचेंज पॉइंट शहरातील काही उद्योजक , संबंधित खात्यातील अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.निधोना व खादगाव येथील जमीनीचा शासकीय दर ८० ते ९६ लक्ष रूपये एकर असून, जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी जमिनीचा शासकीय दर ३० ते ६० लक्ष रूपये प्रति एकर आहे. इंटरचेंजसाठी बहुतेक जिरायत जमीन अधिसूचित करण्यात आलेली आहे. बहुतांश जमीनीला ३० लक्ष रूपये प्रति एकर भाव द्यावा लागेल तर निधोना व खादगाव येथे ८० ते ९६ लक्ष रूपये भाव द्यावा लागेल. त्यामुळे शासनाचे १०० कोटींचे नुकसान होऊ शकते. असे निवेदनात म्हटले आहे.हा इंटरचेंज पॉइंट जेथे प्रस्तावित आहे तेथेच ठेवावा. तो स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न केल्यास जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावातील २०० शेतकरी सामुहिक आत्मदहन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांच्यासह शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. हा प्रश्न प्रारंंभीपासून गाजत असून,याबाबत सर्वत्र मौन पाळले जात आहे.