शेषराव वायाळ/जालना : जालना जिल्हा दौ-यावर असलेले राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार शनिवारी जालना-सिंदखेडराजा रस्त्याने मॉर्निंग वाकला निघाले. रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या मजुरांच्या पालासमोर त्यांना काही मुले दिसली. याबाबत त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. जन्म दाखला नसल्याने दोन मुलांना शाळा प्रवेश मिळाला नसल्याचे कुटुंबियांनी सांगताच नंदकुमार यांनी थेट जळगावच्या शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधला आणि दोन मुलांच्या शाळा प्रवेशाची व्यवस्था करून दिली.शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जालना जिल्ह्याने केलेले प्रयत्न व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नंद कुमार दोन दिवसांच्या जालना दौ-यावर आहेत. शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सर्व शिक्षण विभागाला कामाला लावले आहे.शनिवारी नंद कुमार जालना-सिंदखेडराजा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला निघाले. काही अंतर चालत गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला ठोकलेल्या पालासमोर काही मुले खेळताना दिसली. त्यांनी आपला मोर्चा थेट पालाकडे वळविला. रस्ते कामासाठी जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथून स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांशी संवाद साधला. जन्म दाखला नसल्याने दोन मुलांना शाळा प्रवेश मिळाला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंदकुमार यांनी जळगावच्या शिक्षणाधिका-यांच्या माध्यमातून थेट शहापूर शाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. या शाळाबाह्य मुलांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, बेलदार समाजातील या कुटुंबियांशी बोलताना नंदकुमार म्हणाले, की परदेशात सर्व कामे यंत्राच्या माध्यमातून होतात. तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवा. एक दिवस मजुरांची ही मुले ठेकेदार होतील. तुम्ही काम करा, पण मुलांच्या शिक्षणालाही वेळ द्या, असे सांगत त्यांनी वस्तीवरील काही जणांचे वाचन घेतले. तसेच बेरीज करायला लावून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
शिक्षण सचिवांनी शोधली शाळाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:12 AM