फोटो
धावडा : गत काही दिवसांपासून धावडा व परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रबीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, खरिपातील नुकसानीच्या मदतीची अनेकांना प्रतीक्षा कायम आहे.
धावड्यासह वडोद तांगडा, वाढोणा, भोरखेडा, विझोरा, पोखरी, सेलूद व परिसरातील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर आपल्या शेतीची मशागत करून पेरणी केली. पाणी मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, भाजीपाला आदी पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला. वेळेवर पाणी, खत मिळाल्याने पिकेही जोमात आली होती; परंतु गत आठवड्यापासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. बदलत्या वातावरणामुळे विविध पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गहू, कांदा, ज्वारी पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय कांद्यासह हरभरा, ज्वारी भाजीपाल्यावर मावा येण्याची दाट शक्यता आहे.
परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने वाया गेले. मात्र, आहे त्या रोपामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. असे असले तरी काही भागात शेतकरी कांदा लागवड करत आहेत. या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यासह उशिरा पेरलेला गहू, हरभरा, भाजीपाल्यावरही रोगराई दिसून येत आहे. ही पिके वाचण्यासाठी शेतकरी महागडी औषधांची फवारणी करीत आहेत. खरिपापाठोपाठ रबी हंगाम वाया जातो की काय? अशी चिंता भोरखेडा येथील रंगनाथ सोनवणे, धावडा येथील बिलाल सय्यद, वाढोणा येथील किरण राजपूत, पोखरी येथील अण्णा लुटे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कोट
ढगाळ वातावरणामुळे गहू, कांदा, मक्यावर रोगराई दिसून येत आहे. सध्या गहू भरण्याच्या वेळत असून, थंडीची गरज आहे; परंतु अचानक थंडी गायब झाल्यामुळे गव्हाच्या ओंब्यामध्ये दाणे भरत नसल्याने गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम होणार आहे.
-सुनील खडके
शेतकरी, सेलूद