लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने बळीराजा पुरता भांबावून गेला असून, त्याच्या दैनीला वाण राहिलेले नाही. दरम्यान दोन- चार दिवसांच्या उघडीपीनंतर गुरूवारी सायंकाळी पुन्हा तासभर धो- धो पाऊस येथील परिसरात कोसळल्याने बळीराजाचे अवसान पुन्हा गळाले आहे.मका, सोयाबीन हातचे गेले. निदान अर्धीनिर्धी कपाशी तरी हाती येईल ही वेडी आशा शेतकरी बाळगून होता. मात्र, आता कापसाच्या वाती झाल्या तर आलेली बोंडही काळी होवून गळून पडत आहे. अतिपावसाने कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. यामुळे आता कपाशीच्या आशाही मावळल्या आहेत.मागील दोन दिवसांच्या उघडीपीत शेतकरी कोंब फुटलेली मकाची कणसे, सोयाबीनचे काड जमा करण्यात गुंतला होता. त्यातच गुरुवारी पुन्हा पाऊस बरसल्याने निसर्गाच्या या क्रूरचेष्टेपुढे बळीराजा हतबल झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत निसर्गाने खरीप हंगामाचं दिवाळं काढल्याने बळीराजा अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.सरसकट मदतीची मागणीटेंभुर्णी परिसरात जवळपास सगळीकडेच निसर्गाने हे तांडव मांडल्याने खरीप पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे आता पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने सरसकट एकरी मदत जाहीर करून ती त्वरीत शेतकऱ्यांच्या हाती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीभोकरदन : परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच केदारखेडा येथील पूर्णा नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्याने पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचेही म्हटले आहे. यावेळी महेश पुरोहित, मनीष श्रीवास्तव, रमेश पगारे, शिवाजी पुंड, कृष्णा बोराडे, मारुती गाडेकर, राजू शेळके, रायभान शिंदे, प्रदीप पैठणकर आदींची उपस्थिती होती.
निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:22 AM