जालना : अवैधरित्या गोदामात साठवलेले ४० ऑक्सिजन सिलिंडर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहरातील गरीब शहाबाजार येथून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी मध्यरात्री करण्यात आली. यावेळी तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावा वाढल्याने अनेक रुग्ण बाधित झाले आहेत. दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याचे ऑक्सिजन मोठ्याप्रमानावर लागत आहे. दरम्यान, ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवडा निर्माण झाल्याने काहीजण याचा काळाबाजार करत असल्याचे पुढे आले आहे. रविवारी मध्यरात्री शहरातील गरीब शहाबाजार येथे एका वाहनात ऑक्सिजन सिलिंडर टाकले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक अंजली मिटकरी यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पोलीस प्रशासनासह घटनास्थळ गाठले. यावेळी एका वाहनात ३२ जंबो सिलिंडर व ८ लहान सिलिंडर भरले जात असल्याचे दिसले. याबाबत संबंधितांना विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्व सिलेंडर जप्त केले. घटनास्थळाचा पंचनामा करून वाहनासह सिलिंडर तहसील कार्यालयात रवाना केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.