जालना : कोरोनामुळे औद्योगिक उपयोगासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनवर राज्य सरकारने बंधने आणली आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका हा जालन्यातील स्टील उद्योगाला बसला आहे. या ऑक्सिजनअभावी गुरुवारी जालन्यातील स्टील उद्योजकांनी आपले उत्पादन ४० टक्क्यांनी घटविले आहे. दरम्यान, ऑक्सिजनला तात्पुरता पर्याय म्हणून प्लाझ्मा तंत्रज्ञानाचे कटर वापरण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे या उद्योजकांकडून सांगण्यात आले.
जालन्यात सरासरी १२ स्टील उद्योग असून, १४ रिरोलिंग मिल आहेत. या दोन्ही ठिकाणी विविध साहित्य कटाईसाठी ऑक्सिजनच्या सिलिंडरची गरज असते. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने ८० टक्के ऑक्सिजन हा केवळ रुग्णांसाठी वापरावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधीच दिले आहेत. त्यामुळे जालन्यासह राज्यातील अन्य ठिकाणांवरील उद्योगही ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी अडचणीत सापडले आहेत.
पर्याय अत्यंत खर्चिकअन्य राज्यातून ऑक्सिजन आणून उद्योग चालवावेत, असा पर्याय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिला होता. तो पर्याय त्यांनी मान्य केला आहे. परंतु हा पर्याय अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे एक तर स्टील उद्योजकांनी आपले उत्पादन ५० टक्के करावे, असा पर्याय ठेवण्यात आला आहे. परंतु हे शक्य नसल्याने गुरुवारी बहुतांश स्टील उद्योजकांनी आपले कारखाने एकाच शिफ्टमध्ये चालविणे पसंत केले.
मेटारोलमध्ये कटरचा यशस्वी उपयोगगरज ही शोधाची जननी असते, अशी एक म्हण आहे. त्यातून जालन्यातील मेटारोल इस्पातमध्ये स्टील उत्पादनासाठी लागणारा विविध प्रकारचा स्क्रॅप तोडण्यासाठी पूर्वी ऑक्सिजनचीच गरज होेती. परंतु मेटारोल येथील प्रॉडक्शन विभागाचे प्रमुख डी.पी. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी विजेवर आधारित अब्रेसिव्ह ब्लेडचा वापर करून स्क्रॅपची गुरुवारी यशस्वी कटाई केली.-डी.बी. सोनी, व्यवस्थापकीय संचालक, मेटारोल इस्पात, जालना