वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती प्रकल्प सोमवारी सायंकाळी शंभर टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले. शेलूद येथील धामणा प्रकल्प पाठोपाठ पद्मावती प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने या भागातील ३० गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.
वालसावंगी व परिसरात यंदा कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे प्रकल्प भरेल की नाही याची चिंता सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना लागली होती. परंतु, मागील आठ-दहा दिवसात झालेल्या पावसामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक समाधानकारक झाली आहे. भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा प्रकल्प मागील आठवड्यात ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर आता पद्मावती प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या भागातील २५ ते ३० गावांचा पाणीप्रश्न, शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रकल्पावर पद्मावती, पारधखुर्द, वालसावंगी, पारध, वाढोणासह विदर्भातील मासरूळ, धामणगाव, तराडखेडा, गुम्मी, मढसह इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प भरल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे या भागातील पिकांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
फोटो