जालना : अंबडपासून मार्डी, हस्तपोखरी ते नागझरीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळाली, कामाचे उद्घाटनही थाटामाटात झाले; परंतु, अजूनही कामाला सुरवात झाली नसल्याने वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे ही अवघड झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. रस्त्यावर दगड, मुरूम टाकण्यात आला
आहे. वाहनधारकांना जीवमुठीत धरून वाहने चालवावी लागत
आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण
जालना : विविध मोबाईल कंपन्यांच्या महागड्या प्लानसाठी पैसे माजूनही ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. अंबड तालुक्यातील मठपिंपळगावसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून काही खासगी कंपनीच्या रेंज अभावी ग्राहक वैतागले आहेत. मोबाईल कंपन्या अगोदर वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर महागडे रिचार्ज प्लान ग्राहकांच्या माथी मारतात. आता नेटवर्क नसल्याने संपर्कात व्यत्यय येत आहे.
अंबड येथे अभाविपचे जिल्हा अभ्यास वर्ग
अंबड : शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दोन दिवसीय जालना जिल्हा अभ्यास वर्ग (कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग) घेण्यात आला. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन हनुमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे व मत्स्योदरी देवी संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी अभाविप जिल्हाप्रमुख प्रा. नाना गोडबोले, जिल्हा संयोजक विक्रम राऊत, जिल्हा अभ्यास वर्ग प्रमुख प्रथमेश कुलकर्णी, राजेंद्र भाला, सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी
अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील सुखदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुखापुरी हायस्कूलच्या वतीने नववी व दहावीचे वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाते.
सत्यशोधक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
भोकरदन : तालुक्यातील गोषेगाव येथील मानव विकास व पूर्ण निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित सत्यशोधक विद्यालयाची विद्यार्थिंनी ऋतृजा गणेश खरात हिने शिष्यवृत्ती परीक्षेत ७६ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. अस्मिता गजानन जैवळ, धनराज भोकरे, सागर जैवळ हे विद्यार्थी सुद्धा पात्र ठरलेले आहेत. या यशाबद्दल प्राचार्य सुनील वाकेकर, सचिव जयश्री बनकर, कंकाळ आदींनी कौतुक केले.
सिंचन कामाच्या चौकशीची मागणी
अंबड : मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या ठिबक सिंचन कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा मल्हार सेनेचे रामेश्वर खरात यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला.
हबीब भंडारे यांना देवकाई पुरस्कार
भोकरदन : तालुक्यातील सिरजगाव वाघ्रुळ येथील कवी हबीब भंडारे यांना आर्वी येथील राष्ट्रपिता म. फुले अभ्यासिकेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय देवकाई सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. मनोहर नाईक, प्रकाश बनसोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी समाधान खिल्लारे, सुनील खोडके, डॉ. सिद्धार्थ भगत, जगदीश भगत, प्रा. अरविंद पाटील, रत्ना मनवरे, संजय गोडघाटे, संजय ओरके, सुरेश मेश्राम, सुदाम सोनुले आदींची उपस्थिती होती.
रविवारी भीमशक्ती संघटनेची बैठक
जालना : संभाजीनगर येथील सारनाथ बुद्ध विहारात रविवारी सकाळी साडेअकरा वाजता भीमशक्ती या सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेश सचिव प्रमोदकुमार रत्नपारखे, सरचिटणीस संजय भालेराव, मराठवाडा उपाध्यक्ष भास्कर साळवे, जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, कार्याध्यक्ष सतीश वाहुळे, दिलीप शिंदे, राजू पारखे, सुनील नावकर, शेखर लोखंडे, समाधान रत्नपारखे हे उपस्थित राहणार आहे. यावेळी महिला आघाडीची कार्यकारिणी निवडण्यात येईल. या बैठकीस महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विशाखा सिरसाठ, सुनीता गायकवाड, रंजना काकडे यांनी केले आहे.
धावडा परिसरात पिके जोमात
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले गहू, हरभरा, मक्का आदी पिके जोमात आहे.
विविध मागण्यांचे निवेदन
जालना : हिंगोली येथील नगरपरिषदेचे प्रशासक अधिकारी रामदास पाटील यांची चौकशी करावी, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॅड. रोहित बनवसकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.