बदनापूर : बदनापूर तालुक्यातील अकोलासह परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याचा गैरफायदा घेत काही मंडळी सर्रास अवैध दारूविक्री करीत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवैध दारू विक्री वाढल्याने परिसरात लहान-मोठे तंटे उद्भवत आहेत.
कृषी विज्ञान केंद्र येथे किसान दिन साजरा
जालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात बुधवारी स्वच्छता पंधरवडा व भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने किसान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त कार्यक्रमात पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी रब्बी पिकातील कीड व रोगांचे व्यवस्थापन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. हरभरा पिकातील मर रोग, ज्वारीवरील मावा व इतर रब्बी पिकातील कीड व रोग त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली.
नाताळ सणाच्या स्वागताची जय्यत तयारी
बदनापूर : यंदा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत नाताळ सण साजरा करण्यासाठी बदनापूर शहरासह तालुक्यातील ख्रिस्ती बांधव सज्ज झाले आहेत. नाताळ निमित्त घरांची रंगरंगोटी, वस्तूंची खरेदीपासून ते फराळापर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येथील संत थॉमस चर्चवरील आकर्षक रोषणाई, सजावटीसह चर्चच्या प्रांगणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रसंग मांडणाऱ्या गव्हाणीचे कामही सुरू झाले आहे.
वालसावंगी परिसरात बहरली मोहरी
वालसावंगी : परिसरात सध्या बहरलेले मोहरीचे पीक लक्ष वेधून घेत आहे. वालसावंगी परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात मोहरी पीक घेतले जायचे. मोहरीमुळे शेत पिवळेधमक दिसायचे. मात्र, हळूहळू मोहरीच्या क्षेत्रात मोठी घट होत गेली. तुलनेत इतर रब्बी पिके जास्त फलदायी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी मोहरीच्या पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतशिवारात मोहरीचे तुरळक क्षेत्र दिसत आहे.
वालसावंगी परिसरात रिक्तपदांमुळे ग्रामस्थ त्रस्त
वालसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, शाळेतील शिक्षक, तसेच वीज कर्मचारी अशी पदे रिक्त आहेत. धावडा येथील वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ रिक्त पदे भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कांद्याच्या रोपांची बाजारात किलोने विक्री
तीर्थपुरी : कुंभार पिंपळगाव येथील आठवडे बाजारात बुधवारी कांद्याच्या रोपांची ५० रूपये किलोने विक्री झाली. परतीच्या पावसाने कांद्याच्या बियाण्यांचे मोठे नुकसान झाले, बियाणे उगवले नाही. दुबार बी आणून पेरावे लागले, काही शेतकऱ्यांना रोप मिळणेही अवघड झाले होते. मात्र, आता आठवडे बाजारात कांद्याची तयार रोपे विक्रीला येऊ लागली आहेत. बुधवारी बाजारात कांद्याच्या रोपांची ५० रूपये किलोने विक्री झाली.
कापूस खरेदी केंद्रावर वाहनांची गर्दी
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे. तसेच वाहनांतून मोठ्या प्रमाणावर या केंद्रावर कापसाची आवक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस घरातच पडून होता. शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार घनसावंगी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या वतीने कुंभार पिंपळगाव, राणी उंचेगाव, तीर्थपुरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहनांसह गर्दी केली होती.
हदयरोग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी
जालना : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रूग्णालयात हदयरोग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३० बालकांची तपासणी करण्यात आली. १२ मुलांची हदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रस्त्यावर कचरा
जालना : नगरपालिकेच्या कचरा संकलनाचा फज्जा उडत आहे. अनेक भागात घंटागाड्या येत नाही. विशेष म्हणजे नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी सूचना दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे.
वाहतूक कोंडी कायम
जालना : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारीच हजर नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कादराबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाली
चोरीच्या घटनांत वाढ
जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. अंबड, बदनापूरसह भोकरदन तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हवालदिल झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोना नियमांचा फज्जा
जालना : जालना शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करीत आहे. परंतु, कोणीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत नाही. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.