टेंभुर्णी : टेंभुर्णी- देऊळगावराजा रस्त्यावर बेवारस अवस्थेत एक पुरुष जातीचे नवजात अर्भक मयत अवस्थेत शुक्रवारी आढळून आले. या घटनेची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळताच सपोनि. ज्ञानेश्वर पायघन यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी टेंभुर्णी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सपोनि, ज्ञानेश्वर पायघन यांनी केले आहे. ही कारवाई सपोनि. पायघन, पीएसआय ज्ञानेश्वर साखळे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश वैद्य, गजेंद्र भुतेकर आदींनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : जिल्ह्यात साउंड सिस्टिमला परवानगी द्यावी, अशी मागणी जालना जिल्हा साउंड लाइट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर निकश मोरे, सुनील गायकवाड, कैलास नाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्याची मागणी
जालना : सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दरमहा एक तारखेला देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर भीमसेना पँथर्स पार्टीचे मधुकर घेवंदे, रिपब्लिकन पार्टी फॉक इंडियाच्या वतीने किशोर मघाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.