जालना : शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावरून दोन्ही बाजूंनी भरधाव वेगात वाहने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या भागात गतिरोधक बसवावे, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.
गुरूवारपासून पोलीस दलाची वार्षिक तपासणी
जालना : जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची विशेष पोलीस महानिरीक्षक गुरूवारपासून तपासणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख हे पोलीस दलातील कामकाजाचा आढावा घेत आहेत. विविध ठाण्यांना भेटी देऊन कामकाजाबाबत सूचना केल्या जात आहेत.
रामनगर परिसरातील महिलांना मार्गदर्शन
जालना : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी क्रांतीसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने फिरते समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून रामनगर भागातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष विष्णू पिवळ, समुपदेशक उषा शिंदे, आयोध्या टेमकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची गैरसोय
परतूर : तालुक्यातील आष्टी येथील बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सातोना येथे कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत आहे. शेतकऱ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आष्टीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
२१ दात्यांचे रक्तदान
जालना : शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय रासेयो विभागाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. शोभा यशवंते, विजयमाला घुगे, डॉ. संतोष देशपांडे आदींची उपस्थिती होती.