भोकरदन : तालुक्यातील दगडवाडी, कठोरा बाजार, दानापूर, देहेड, मूर्तड आदी भागात रब्बीतील पिके जोमात आली आहेत. जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी असल्याने याचा पिकांनाही लाभ होत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून रब्बीतील पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे . अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
जामखेड येथे कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील जामखेड येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले. युवकांनी शेतीकडे वळून शेतीपूरक व्यवसाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जामखेड आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सभापती सतीश होंडे, पल्लवी तार्डे, अशोक आघाव, देविदास कुचे, श्रीराम जाधव आदींची उपस्थित होती.
रस्ता दुरूस्तीची मागणी
जालना : शहरातील बालाजी चौकातून नवीन मोंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे. वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याची दुरूस्ती केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
प्रकल्पात मुबलक पाणी
बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील प्रकल्पात सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. या प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्याकडे भर दिला आहे. जवळपास दोनशे हेक्टरवरील शेतीसाठी पाण्याची मागणीही शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. पाण्याचा जपून वापर व्हावा, यासाठी ठिबक, तुषार संचचा वापर होेणे गरजेचे आहे.