जालना : शहरातील शनिमंदिर चौकासह परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. शिवाय या भागात अवजड वाहनेही येत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागातील वाहतूक सिग्नल सुरू करावेत, नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या नागरिकांमधून केली जात आहे.
कारवाईची मागणी
परतूर : ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री, गुटखा विक्री जोमात सुरू आहे. शहरी, ग्रामीण भागातील मार्गावरील धाब्यांवर राजरोस अवैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे युवापिढी व्यसनाधीन होत असून, भांडण तंट्यात वाढ होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
केंद्रावर वाहनांच्या रांगा
बदनापूर : येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी मोठ्या संख्येने कापूस खरेदीसाठी आणत आहेत. या केंद्रावर रविवारपर्यंत ४५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. या केंद्राच्या परिसरात सध्या जवळपास दोनशेवर वाहने उभी आहेत. या वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाची वेळेत खरेदी व्हावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.