अंबड : तालुक्यातील बनटाकळी येथे आयोजित शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ॲड. किशोर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उमेश वैद्य, सोनुरे यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन
जालना : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने यावर्षीचा युवा महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २६ डिसेंबर रोजी ऑनलाईन घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्रीडाधिकारी अरविंद विद्यासागर यांनी केले आहे. १५ ते २९ वयोगटत्ततील युवक, युवतींना या महोत्सवात सहभाग नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात आले.
ई-संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
जालना : जिल्ह्यातील रूग्णांना विविध आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी, औषधोपचार करण्यासाठी ई- संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीचा जिल्ह्यातील रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले आहे. मोबाईलमध्ये ई- संजीवनी ॲप डाऊनलोड करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
चालकांची कसरत
परतूर : शहरातील तहसील कार्यालय ते टेलिफोन भवन दरम्यानच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर टाकलेला मुरूमही निघून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
आरोग्य तपासणी
मंठा : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने रेणुका विद्यालयात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रसाद काळे, डॉ. ज्योती सरपाते, सचिन सोनुने, दीपाली ढवळी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.