जालना : निवडणूक विभागाने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी केले आहे. मतदार यादीतील काही चुकांची दुरूस्ती करायची असेल तर त्याचीही प्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहनही रत्नपारखे यांच्यासह किशोर जाधव व इतरांनी केले आहे.
एटीएममध्ये खडखडाट
मंठा : शहरातील बाजारपेठेसह इतर भागात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम मशीन आहेत. मात्र, त्यातील बहुतांश एटीएम मशीनमध्ये पैसेच नसतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित बँक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्वच एटीएममध्ये मुबलक प्रमाणात पैसे ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
दत्त जयंतीनिमित्त गणपती गल्लीत कार्यक्रम
जालना : जुना जालना भागातील गणपती गल्लीतील दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी पुरोहितांद्वारे लघुरूद्र अभिषेक विष्णुपंत किनगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुधाकर लोखंडे, विश्वस्त प्रकाश वडगावकर, विनायक महाराज फुलंब्रीकर, श्रीपाद पाठक, बाबा महाराज, विवेक रूपदे, व्यंकटेश महाहुरकर आदींची उपस्थिती होती.
आठ शेळ्यांचा फडशा
भोकरदन : तालुक्यातील वालसावंगी शिवारात लांडग्याने हल्ला करून आठ शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेने शेतकरी अशोक गवळी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच वनरक्षक योगेश डोमळे, वनपाल यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मुद्रेगाव येथे कार्यक्रम
घनसावंगी : तालुक्यातील मुद्रेगाव येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना प्रतिसाद मिळत आहे. आजवर विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली आहे. हा कार्यक्रम ३० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. तरी मुद्रेगाव व परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.