बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघु व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, घरगुती ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शेतशिवारातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
अनुदान देण्याची मागणी
जाफराबाद : येथील नगर पंचायती अंतर्गत पंतप्रधान घरकूल आवास योजना सन २०१८ शहरात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अनेकांना अनुदान मंजूर असून, ते अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी तहसीलदार सतीश सोनी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा अनिल र्बोर्डे, प्रमोद हिवाळे, जितेंद्र हिवाळे, सिध्दार्थ पैठणे व इतर लाभार्थ्यांनी दिला आहे.