भोकरदन : राज्य परिवहन महामंडळाच्या भोकरदन आगारातून नळणी, बरंजळा साबळे, बरंजळा लोखंडे आदी भागातील बस फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी वाहतूक नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. बसफेऱ्या कमी असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर नारायण लोखंडे, कृष्णा लोखंडे, विठ्ठल लोखंडे, निलेश साबळे, प्रकाश राऊत आदींच्या सह्या आहेत.
विद्यार्थ्यांशी संवाद
मंठा : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी चला संवाद साधू या या उपक्रमांतर्गत बरबडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, राबविलेले उपक्रम याची माहिती धस यांनी घेतली. या उपक्रमात केंद्रप्रमुख नागनाथ गोरे, दीपक बागल, जी. एम. वायाळ, बनसोडे, नामदेव चव्हाळ व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा व भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पीक संरक्षण तज्ज्ञ विजय मिटकरी यांनी रब्बी पिकांतील कीड व रोगांचे व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.
वाहनांवर कारवाई
शहागड : अंबड तालुक्यातील गोंदी जवळील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोंदी पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत एका ट्रॅक्टरसह वाळू असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित ट्रॅक्टर चालक, मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.