जालना : शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना दालमिल, फळे व भाजीपाला प्रक्रिया, पशुखाद्य, आटा प्रोसेसिंग, धान्य, मका स्वच्छता आणि ग्रेडिंग, सीताफळ, भाजीपाला, केळी प्रक्रिया करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुलामुलींना मार्गदर्शन
अंबड : तालुक्यातील शेवगा येथील अंगणवाडीत राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक माया सुतार यांनी आरोग्याची काळजी या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमास आरोग्य सेविका वैशाली डोंगरदेवे, तबसुम शेख, अन्नपूर्णा खरात, बोंगाणे यांच्यासह शेवगा येथील पालक, मुला-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
खंडित विजेमुळे गैरसोय
जालना : शहासह तालुक्यातील विविध भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज अचानक गुल होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. शेतातील कामे खोळंबत असून, व्यावसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गत अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
जयपूर रोडवर नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर
वाटूर फाटा : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील जयपूर मार्गावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या खड्ड्याजवळील नाली तुंबली असून, अस्वच्छ पाणी रस्त्यावर येत आहे. या घाणपाण्यामुळे दुचाकी स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पादचारी नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन खड्डा बुजविण्यासह नालीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.