भोकरदन : भोकरदन तालुक्यातील गोषेगाव येथील मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित सत्यशोधक विद्यालयातील ऋतुजा गणेश खरात या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत ७६ टक्के गुण घेऊन यश संपादन केले. या यशाबद्दल प्राचार्य सुनील वाकेकर, जयश्री बनकर आदींनी कौतुक केले. सिंधी काळेगावात थंडी वाढली ; शेकोट्या पेटल्या
रामनगर : जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीने चांगलाच जोर धरला आहे. ग्रामीण भागात नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या करून थंडीपासून बचाव करत आहेत. थंडी आणि गारव्यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांना मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत.
सुतगिरणीतील कामगारांचे वेतन द्या
जालना : जालना सहकारी सूतगिरणी ही बऱ्याच वर्षापासून बंद आहे. बंद पडली, तेव्हा कामगारांचे वेतनही देण्यात आले नव्हते. सदर प्रकरण औद्याेगिक न्यायालयात चालू असताना न्यायालयाने कामगारांच्या हिताचा निर्णय दिला आहे. त्या तडजोडीनुसार कामगारांचे वेतन देण्याचे ठरले होते. परंतु, तसे झाले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी ॲड. जयश्री किंगरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली. निवेदनावर हेमंत खंदारे, प्रदीप सिरसाट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अंबड तालुक्यातील गरजूंना वस्त्रदान
जालना : नाताळानिमित्त ग्रामीण भागातील गरजूंना साडी, ब्लँकेट, स्वेटर मुलांना कपडे वाटप करण्यात आले. अंबड तालुक्यातील बोरी येथील संतपॉल चर्चमध्ये हा वस्त्रदानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दूधपुरी, ताडहादगाव, खडकेश्वर, बोरी, पानेगाव, हिस्वन, अंतरवाली राठी, अंबड येथील महिलांची उपस्थिती होती. या प्रसंगी पी.एस. ठाकूर, जॉन हतागडे, फिलीप लोखंडे, शाम श्रीसंदुर, विजय नवगिरे, ब्रिजेश नायर आदींची उपस्थिती होती.
ऑनलाईन गीता जयंती महोत्सवाचे आयोजन
जालना : गीता परिवार आयोजित पूज्य आचार्य बाळकृष्णजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व गीता परिवाराचे संस्थापक पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन गीता जयंती महोत्सवाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत करण्यात आले आहे. या महोत्सवात जगातील ७० देशांमधील ५० हजार गीताप्रेमींच्या वतीने एक लाख अध्याय पठन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मासेगावात लोकवर्गणीतून मंदिराची उभारणी
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथे लोकवर्गणीतून मंदिर उभारणीचे काम होणार आहे. या मंदिराची उंची ६१ फूट राहणार आहे. या संदर्भात नुकतीच ग्रामस्थांची बैठक होऊन त्यात चर्चा झाली. या मंदिराच्या बांधकामासाठी ६ लाख ५१ हजार रूपये एवढा खर्च येणार असून, ३० डिसेंबर रोजी या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. येत्या १२ महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे.