- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अंतरवाली सराटीनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आता शहागडच्या पैठण फाटा येथील कार्यालयातून आपला सामाजिक आणि राजकीय कारभार हाकणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्याने राजकीय भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. तसेच इच्छुकांनी आपल्या मतदारसंघाची माहिती घेऊन भेटावे असे आवाहन जरांगे यांनी केल्यानंतर अंतरवाली सराटीकडे ओघ वाढला आहे.
धुळे सोलापूर महामार्गावरील पैठण फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जन आक्रोश आंदोलन केलं होत. त्याच पैठण फाटा परिसरामध्ये जरांगे यांनी आपलं कार्यालय सुरू करणार आहेत. आता अंतरवली सराटीनंतर शहागड पैठण फाटा येथील कार्यालयातून मनोज जरांगे आपलं पुढील आंदोलन आणि राजकीय भूमिका सुरू ठेवणार आहेत. त्या ठिकाणी वॉर रूम, ऑफिस, बैठक, मीटिंग हॉल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पैठण फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यालयाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत येत्या २९ ऑगस्ट रोजी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, २० ऑगस्टपर्यंत सर्व भागातील उमेदवारांचा आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. निवडणूक लढताना जातीवाद नसला पाहिजे. तो उमेदवार सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणार असावा, असा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. नाशिक येथून जरांगे अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्यानंतर विधानसभेसाठी अनेक इच्छुक त्यांची भेट घेत आहेत.